LIVE UPDATES

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तात्काळ सुरू करा; स्थानिकांना रोजगाराला प्राधान्य द्या: आमदार प्रमोद जठार

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 13, 2026 22:37 PM
views 26  views

रत्नागिरी : कोकणच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तात्काळ सुरू करण्यात यावा आणि नव्या ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीपूर्वी स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जठार यांनी सांगितले की, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता हा प्रकल्प तातडीने सुरू करावा. यामुळे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.

यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जैतापूर प्रकल्प प्राधान्याने सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन दिल्याचे जठार यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी भाजपच्या आगामी ‘कोकण संकल्प २०२६ ते २०३८’ या विकास आराखड्याचाही उल्लेख केला. कोकणातील युवकांचे रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर थांबवणे हे या आराखड्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

“कोकणातील तरुण अभिमानाने सांगेल की, मी नोकरीसाठी मुंबईला गेलो नाही, उलट मुंबईतील लोक रोजगारासाठी कोकणात येत आहेत, तो दिवस कोकणच्या खऱ्या विकासाचा असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जैतापूरसारखा मोठा ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास जिल्ह्यात हजारो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच उद्योग, सेवा आणि पूरक व्यवसायांना चालना मिळून कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर होऊन कोकणातील औद्योगिक विकासाला वेग मिळेल, असा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.