
कणकवली : कणकवली नगरपंचायतीत विविध विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींनीच गैरव्यवहाराला चालना दिल्याचा आरोप माजी नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे निवेदनही सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. हर्णे बोलत होते. यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, मेघा गांगण उपस्थित होते.श्री. हर्णे म्हणाले, नगरपंचायतीने अंडरग्राऊंड वॉटर स्कीमसंदर्भात नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार पाईपलाइन वाढविण्याची शिफारस करावी आणि उपलब्ध निधीनुसार कामे करण्यात यावीत, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्या सुमारे २२ कोटी रुपयांच्या योजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ही योजना ५० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सदर प्रकल्पाची कामे पूर्ण झालेली असतानाही पुन्हा निविदा काढण्यात आल्याने भ्रष्टाचाराचा श्रीगणेशा झाल्याचे हर्णे यांनी म्हटले. यासंदर्भातील पुरावे योग्य वेळी सादर करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रक्रियेत संबंधित विभागाला पाच लाख रुपये दिल्याचाही आरोप त्यांनी केला. नगरपंचायतीच्या निधीतून कोणतेही ठोस विकासकाम झाले नसल्याचा दावा करत, नगरसेवक म्हणून अशा निर्णयांना विरोध करण्यात येईल, असे हर्णे यांनी सांगितले.जनतेपर्यंत हा विषय पोहोचावा यासाठी माध्यमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हर्णे यांनी नगराध्यक्ष संदेश पाकर यांच्यावरही टीका केली. नगराध्यक्ष सातत्याने मुंबई दौरे करत असून विविध राजकीय पक्षांशी संपर्क साधत असल्याचा आरोप त्यांनी केला. कणकवलीच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसत नाहीत. शहराचा विकास हेच प्राधान्य असायला हवे, असे मत हर्णे यांनी व्यक्त केले.













