
सिंधुदुर्गनगरी : विशेष सखोल पुनरावृत्ती अर्थात SIR प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनातून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे हे आंदोलन करण्यात आले.
निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्षपणे पार पाडणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान 14 वेळा निवडणूक आयोगातील काही निर्णयांवर अधिकृत आक्षेप नोंदवले, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे आक्षेप नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे अथवा पुनर्स्थापित करणे, SIR प्रक्रियेतील अपील तसेच मतदार यादीच्या IT प्रणालीच्या व्यवस्थापनाशी संबंधित असल्याचे वृत्तात नमूद आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. SIRच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याने पात्र मतदारांचा मतदानाचा अधिकार बाधित होऊ शकतो, अशी भूमिका काँग्रेसने मांडली.
निवेदनात पश्चिम बंगाल, बिहार तसेच महाराष्ट्रातील मतदारयादीसंदर्भातील आरोपांचा उल्लेख करण्यात आला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचाही काँग्रेसने संदर्भ दिला. मात्र, या आरोपांवर निवडणूक आयोगाने काही निर्णय सर्व सदस्यांच्या सहमतीने घेतल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे या मुद्द्यावर राजकीय वाद कायम आहे.
“लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना पदावरून दूर करावे आणि अटक करावी,” अशी मागणी जिल्हा काँग्रेसने केली.












