LIVE UPDATES

रत्नागिरीत "सेवा अभियान" ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रमोद जठार यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 19, 2026 13:56 PM
views 46  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियान’ अंतर्गत रत्नागिरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांची निवेदने स्वीकारण्यात आली. यावेळी भाजपा कोकण विभागाचे संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आमदार प्रमोद जठार व श्री. संतोष साखरे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. विविध विकासकामे, शासकीय प्रश्न तसेच प्रलंबित कामांबाबत नागरिकांनी आपल्या अडचणी व मागण्या मांडत निवेदने सादर केली.

नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची आमदार प्रमोद जठार व संतोष साखरे यांनी आस्थेने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या अडचणी सोडविणे आणि त्यांच्या हक्काचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडणे, हीच ‘सेवा अभियानाची’ भूमिका आहे, असे यावेळी नागरिकांना आश्वासित केले.

या उपक्रमातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते थेट नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने उपलब्ध राहून विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘सेवा हीच संघटनेची ओळख आणि नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण हेच आमचे ध्येय’ या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळत आहे.

यावेळी रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, मंडळ अध्यक्ष दादा ढेकणे, डॉ.ऋषीकेश केळकर, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.