LIVE UPDATES

माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

नेहमीच्या तक्रारींची सीईओंकडून गंभीर दखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 16:29 PM
views 1021  views

सिंधुदुर्गगरी : माध्यमिक शिक्षण विभागातील वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी गंभीर दखल घेतली असून, विभागाचा कारभार अधिक गतिमान व पारदर्शक करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने सीईओ खेबुडकर यांनी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये तसेच शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागावीत, यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक वगळता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी नव्याने अन्य कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिली.

विभागातील कामकाजात सुसूत्रता आणण्याबरोबरच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेळेत करण्यावर भर देण्यात येणार असून, भविष्यात तक्रारींची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.