
सिंधुदुर्गनगरी : पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रस्तावित अधिसूचनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील एकूण २५ गावांचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामध्ये (Eco-Sensitive Area) समावेश करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोड व पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. या टास्क फोर्सचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी असून सदस्य सचिव सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा), सावंतवाडी आहेत. समितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार सावंतवाडी व दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली व दोडामार्ग तसेच पोलीस निरीक्षक सावंतवाडी व दोडामार्ग यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
टास्क फोर्सच्या मासिक बैठकीमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधित क्षेत्रात संबंधित विभागांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा, पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा, प्रचार-प्रसिद्धीचा तसेच प्राप्त तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो. दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही गावात खाजगी मालकीच्या अथवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे किंवा वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील, वनरक्षक किंवा तलाठी यांच्यापैकी कोणालाही माहिती द्यावी, असे आवाहन सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीच्या वतीने केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील या गावांचा समावेश
असनिये, पडवे-माजगाव, भालावळ, तांबोळे, सरमळे (नेवलीसह), दाभिळ, ओटवणे, कोनास, धारपी, उडेली, केसरी व फणसवडे या गावांचा समावेश आहे.
दोडामार्ग तालुक्यातील या गावांचा समावेश
दोडामार्ग तालुक्यातील कुंभ्रल, पंतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, कळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली व फुकेरी या गावांचा यामध्ये समावेश आहे.
माहिती प्राप्त होताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी जाऊन तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करतील. अशा चौकशीदरम्यान शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करावे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड केल्यास भारतीय वन अधिनियम, १९२७, महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (झाडे इत्यादींच्या बाबतीतील अधिकारांचे नियमन करण्याबाबत) नियम, १९६७ अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
वृक्षतोडीबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीच्या sdtfsawantwadi@gmail.com या ई-मेल संपर्क साधावा. या ई-मेलवर वृक्षतोडीच्या घटनांबाबत नागरिक तक्रार नोंदवू शकतात. तसेच ०२३६३-२७२००५ या दूरध्वनी क्रमांकावरही वृक्षतोडीबाबत तक्रार नोंदविता येईल. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचे संरक्षण, वृक्षतोडीस प्रतिबंध आणि पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहून वृक्षतोडीच्या घटना निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी.











