
चिपळूण : ग्रामीण भागातील पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे वाढता कल आणि स्थलांतरामुळे चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसमोर गंभीर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात पहिलीच्या पटसंख्येत मोठी घट झाल्यामुळे प्रशासनाला तालुक्यातील तब्बल ६ जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला असून, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळील इतर शाळांमध्ये समायोजन केले जात आहे.
शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ७,३६६ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यापैकी इयत्ता पहिलीत ९८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पहिलीतील प्रवेशसंख्या ८६७ वर आली असून, १२० विद्यार्थ्यांची घट झाली आहे. या घटत्या पटसंख्येमुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या अत्यल्प झाली असून, अखेर ६ शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
यामध्ये मुंढे खोत, रावळगाव क्रमांक २, ढाकमोळी चिंच, कोलकेवाडी-जांब्रारी, कुटरे खेर आणि कुटरे बौद्धवाडी येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळील इतर शाळांमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरूजींकडून शाळा टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक वाडी-वस्त्यांवर जाऊन पालकांशी संवाद साधत आहेत, मराठी शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, पोषण आहार, डिजिटल शिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रोत्साहित करत आहेत. मात्र, त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून डिजिटल वर्ग, आधुनिक शैक्षणिक साधने, पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता वाढीवर भर दिला जात असला तरी पालकांचा वाढता खासगी शाळांकडे कल थांबविण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे भविष्यात आणखी शाळांवर बंद होण्याची वेळ येऊ नये, यासाठी शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
चिपळूण शहरातील खेंड शाळेचा आदर्श घेण्यासारखा
तालुक्यात पटसंख्या घटल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडत असताना चिपळूण शहरातील खेंड येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र आशेचा किरण दाखवला आहे. एकेकाळी बंद पडलेली ही शाळा शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली आहे. शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर मोरे यांनी घराघरांत जाऊन पालकांशी संवाद साधला, पालकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यात यश आले आणि शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढू लागला. मराठी शाळा टिकविण्याचे मोठे आव्हान असताना खेंड येथील शाळेने उभा केलेला हा आदर्श तालुक्यातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असून, योग्य नियोजन, पालकांशी संवाद आणि शिक्षकांची जिद्द असेल तर मराठी शाळाही पुन्हा बहरून येऊ शकते, हे या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे.










