LIVE UPDATES

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे विजेतेपद

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 18:52 PM
views 22  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले. या शानदार विजयामुळे संघाने विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.  जिल्हास्तरीय विजेतेपद मिळवून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला दबदबा कायम राखला.

वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे नुकत्याच या स्पर्धा झाल्या. मंगळवारी झालेल्या सतरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल संघाने प्रथम फेरीत पोतदार स्कूल कणकवली संघाविरुद्ध २-० गोल ने मात करत विजय मिळवला. कप्तान कॅडेट आर्यन वरेकर याने शानदार गोल करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. उपांत्य फेरीत कुडाळ हायस्कूल विरुद्ध ४-० गोलने दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. यामध्ये कॅडेट दुर्वेश कोटनाके याने २ गोल तर कॅडेट ओम गोसावी कॅडेट मुश्ताक सिद्दीकी यांनी प्रत्येकी १ गोल नोंदवत दर्जेदार खेळाचे दर्शन घडवले. अंतिम सामन्यात वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव विरुद्ध २-० गोल करून विजेतेपद पटकावले. कॅडेट आर्यन वरेकर व कॅडेट ओम गोसावी यांनी प्रत्येकी १ गोल नोंदवत या अटीतटीच्या सामन्यात संघाला विजेतेपद मिळवून दिले. सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर सतरा वर्षाखालील वयोगटातील फुटबाल विजेतेपद पंधरा वर्षाखालील वयोगटातील उप विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने क्रीडा क्षेत्रातील दर्जा व गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. विभागस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने प्राप्त केला आहे. पंधरा वर्षाखालील वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल संघाने प्रथम फेरीत शिवराज मराठा विद्यालय संघाविरुद्ध १-० गोल ने मात करत विजय मिळवला. कॅडेट मंथन झाडे याने शानदार गोल नोंदवला. उपांत्य फेरीत एन नंबर संघाविरुद्ध २-० गोल फरकाने विजय मिळवला. कॅडेट अक्षत धुरी व कॅडेट वर्धन मलिक यांनी प्रत्येकी १ गोल नोंदवत या अटीतटीच्या सामन्यात संघाला विजेतेपद मिळवून दिले. अंतिम अटीतटीच्या सामन्यात मिलाग्रीस स्कूल विरुद्ध उप विजेतेपद मिळवले. फुटबॉल स्पर्धेतील विजेते संघ व क्रीडाशिक्षक सतीश आईर व मनोज देसाई यांचे संस्थाध्यक्ष सुनील राऊळ, सेक्रेटरी जॉय डॉन्टस, ऑफिस सेक्रेटरी दिपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे यांनी अभिनंदन केले. या यशाबद्दल विजयी संघाचे शाळेचे शिक्षक वृंद, प्रशिक्षक तसेच पालकांनी अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेतही संघाने अशीच दमदार कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्वल करावे असा विश्वास यवक्त केला आहे.