LIVE UPDATES

"माझा भाऊ म्हणजे मीच मंत्री" : आमदार निलेश राणे

निलेश राणेंना मंत्रीपद मिळण्यासाठी कार्यकर्त्यांचे बाप्पाला गाऱ्हाणे : कुडाळमध्ये थाटात सिंधुदुर्गच्या राजाची विसर्जन मिरवणूक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 19:38 PM
views 53  views

कुडाळ : कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौकाजवळील पटांगणात तब्बल सतरा दिवस विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला बुधवारी सायंकाळी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात सुरुवात झाली. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'चा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि बँडच्या साथीने ही मिरवणूक कुडाळ शहरातून पावशी तलावाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

डीजेबंदीच्या नियमांचे कडक पालन

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डीजेबंदीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात आले. मिरवणुकीत डीजेचा वापर टाळून पारंपरिक बँजो  आणि वाद्यांचा समावेश करण्यात आला होता. वाद्यांच्या गजरात गणेशभक्त तल्लीन झाले होते. मिरवणुकीदरम्यान शहरात ठिकठिकाणी बाप्पाच्या रथावर भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.

विसर्जनाच्या प्रसंगी पारंपरिक पद्धतीने बाप्पाला गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांना मंत्रिमंडळात लवकरात लवकर 'मंत्रीपद' मिळावे, असे गाऱ्हाणे श्रींच्या चरणी घातले. कार्यकर्त्यांचे आपल्यावरील हे प्रेम पाहून आमदार राणे यांनी समाधान व्यक्त केले. कार्यकर्त्यांच्या या इच्छेवर आणि प्रेमावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले, "कार्यकर्त्यांचे माझ्यावर अत्यंत प्रेम आहे, पण माझा भाऊ मंत्री होणे म्हणजेच मी स्वत: मंत्री झाल्यासारखे आहे."

यावेळी पुढे बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, "गेल्या सतरा वर्षांपासून आम्ही अत्यंत भक्तिभावाने राजाची स्थापना करत आहोत. सध्या दुष्काळाचे सावट असल्याने आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने ही विसर्जन मिरवणूक काढली आहे. आमचा शेतकरी व बळीराजा या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावा आणि हे दुष्काळाचे सावट दूर व्हावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली आहे. सभागृहात असो वा बाहेर, आम्ही सदैव जनतेच्या हितासाठीच प्रयत्नशील असतो."

या विसर्जन मिरवणुकीत आमदार निलेश राणे यांच्यासह 'सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान'चे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि हजारो गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी उशिरा पावशी येथील तलावात 'सिंधुदुर्गचा राजा'चे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात येणार आहे.