
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू वर्षी सप्टेंबर महिन्यात पर्जन्यमानाने मोठी ओढ दिली असून सरासरीच्या तुलनेत ५६ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. 'ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे' यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ५० वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल १९१.५ मिमी पाऊस कमी झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९७१ ते २०२० या ५० वर्षांच्या कालावधीचा विचार करता सप्टेंबर महिन्यात सरासरी ३४४.० मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यावर्षी सप्टेंबर २०२६ मध्ये जिल्ह्यात केवळ १५२.५ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत पावसाचे हे प्रमाण अत्यंत कमी असल्याने यंदा ५६ टक्के तूट निर्माण झाली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने ओढ दिल्याने त्याचा फटका शेतीकामांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भातपिके परिपक्व होण्याच्या आणि निसवण्याच्या काळातच पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांच्या वतीने शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार पिकांची योग्य काळजी घेण्याचे व पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










