
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे गायकवाडवाडी येथे रस्त्याच्या बाजूला एका नर बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली आहे. कुचांबे येथील स्थानिक नागरिक अविनाश भिकाजी टाकळे यांनी रस्त्यालगत मृतदेह पाहताच तात्काळ संगमेश्वर वन विभागाला दूरध्वनीवरून याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
प्राथमिक पाहणीनुसार या नर बिबट्याचा मृत्यू साधारण ९ ते १० दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रदीर्घ कालावधीमुळे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. यानंतर कडवई येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली. हा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष त्यांनी नोंदवला.
वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शासकीय नियमावलीनुसार घटनास्थळीच लाकडाची चिता रचून बिबट्याच्या अवयवांवर अग्निसंस्कार करण्यात आले आणि सर्व अवशेष पूर्णपणे नष्ट करण्यात आले.
सदर कारवाई चिपळूण-रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी, आरवलीचे वनरक्षक सूरज तेली, साखरपाचे वनरक्षक सहयोग कराडे, फुणगुसचे वनरक्षक आकाश कडूकर, कुटगिरीच्या पोलिस पाटील तसेच प्राणीमित्र प्रणित टाकळे आणि शंकर जागुष्टे सहभागी झाले होते.
दरम्यान, ग्रामीण भागात कोणताही वन्यजीव संकटात अथवा मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी त्वरित वन विभागाच्या ‘१९२६’ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all











