LIVE UPDATES

गणेश सजावट स्पर्धेतून कुडाळ शहरातील शिवसेना संघटना मजबूत

आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन : ५१ विजेत्यांना पारितोषिक वितरण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 19:51 PM
views 30  views

कुडाळ : कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे शहरांमधील संघटना मजबूत होत आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. 

कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन शिवसेनेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी मिळून केले होते. या स्पर्धेमध्ये ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये करण्यात आला. यामध्ये प्रभाग निहाय घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धेमध्ये ५१ विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले आणि या ५१ मधून प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ मिळवलेल्या प्रथम साई तळवणेकर, द्वितीय सत्यवान राऊळ तृतीय दीपक पाटील, उत्तेजनार्थ राजाराम गडेकर, प्रदीप राऊळ यांना पारितोषिक देण्यात आली.

या बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी आमदार निलेश राणे, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदनी कांबळी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत आणि हे पक्ष वाढीसाठी पूरक आहेत. गणेश सजावट स्पर्धेच्या माध्यमातून संघटना घराघरापर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम राबवला तो कौतुकास्पद आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.