LIVE UPDATES

२ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा ‘नो यूपीआय डे’

एमडीआरचा आर्थिक भार व्यापाऱ्यांवर न टाकण्याची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 29, 2026 13:54 PM
views 35  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने देशपातळीवरील व्यापारी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येत्या २ ऑक्टोबर रोजी ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायातील व्यवहार केवळ रोखीने करण्याचे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

२ ऑक्टोबर रोजी ग्राहकांकडून यूपीआय किंवा अन्य ऑनलाइन माध्यमातून पैसे स्वीकारू नयेत, असे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे. ऑनलाइन व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर (Merchant Discount Rate) लागू करण्याच्या प्रस्तावित निर्णयाबाबत व्यापारी बांधवांच्या तीव्र भावना केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.

‘आमचा यूपीआय किंवा एमडीआरला विरोध नाही. मात्र, एमडीआरचा आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडू नये, एवढीच आमची मागणी आहे,’ अशी भूमिका सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत आणि कार्यवाह चंद्रकांत ऊर्फ राजू जठार यांनी व्यक्त केली आहे.

२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ‘नो यूपीआय डे’मध्ये सहभागी होऊन ऑनलाइन व्यवहारांऐवजी रोखीने व्यवहार करावेत, असे आवाहन महासंघाने केले आहे.