LIVE UPDATES

अंगारक संकष्टीला बाप्पाला सहस्र मोदकांचा नैवेद्य

वैश्यवाड्यात षट् सहस्त्र मोदक अर्पण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 15:15 PM
views 47  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : अंगारक चतुर्थीच्या दिवशी शहरातील २१ दिवस विराजमान सार्वजनिक गणपतीला भक्तांकडून दरवर्षी सहस्र मोदक नैवेद्य अर्पण केला जातो. यावर्षी देखील वैश्यवाडा व उभाबाजार येथील हनुमान मंदिरात विराजमान श्रींना सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने अथर्वशीर्ष पठणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

वैश्यवाडा सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिरात अंगारक संकष्टी निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला लाभला. यावेळी सुमारे ६ हजार ११२ मोदकांचा नैवेद्य 'श्रीं' ना अर्पण करण्यात आला. अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम दिक्षित भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. पूजेचे मानकरी गुरुनाथ मठकर होते. तर दुपारी महाआरती होऊन श्रींना मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. गणेशोत्सवातील अंगारक संकष्टी असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. 

दरम्यान, उभाबाजार मारूती मंदिर येथे देखील भक्तांकडून दरवर्षी प्रमाणे सहस्र मोदकांचा नैवेद्य गणरायाला भक्तीभावाने अर्पण करण्यात आला. यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. पुजेचा मान श्री. वंजारी यांना देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. नैवेद्य अर्पण करण्यात आल्यानंतर हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.