LIVE UPDATES

अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे शेतकऱ्यांच्या बांधावर

कारिवणे , आवळेगावात भात नुकसानीची पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 13:55 PM
views 54  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : तालुक्यातील कारिवणे आणि आवळेगाव येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी श्रीम. शुभांगी साठे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष शेतावर जाऊन 'डीसीएस' (डिजिटल क्रॉप सर्व्हे) पीक पाहणी केली. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भात पीक नुकसानीची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.  

या पाहणी दौऱ्या दरम्यान ओरोस बुद्रुकचे मंडळ अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी, तसेच स्थानिक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

पिकांच्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा

तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी साठे यांनी कारिवणे व आवळेगाव येथील शेतांमध्ये जाऊन पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी केली. ई-पिक पाहणी अंतर्गत 'डीसीएस' प्रणालीद्वारे पिकांच्या नोंदी कशा प्रकारे केल्या जात आहेत, याचीही त्यांनी खातरजमा केली.

पाहणी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या अडीअडचणी व पीक नुकसानीबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. प्रशासनाकडून योग्य ते पंचनामे व नोंदी पूर्ण करून शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.