LIVE UPDATES

जे ठाण्यात घडलं ते सिंधुदुर्गात घडणार तर नाही ना ?

ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या पॅनलने रवींद्र चव्हाणांच्या पॅनेलला धूळ चारली
Edited by:
Published on: June 30, 2026 11:28 AM
views 111  views

सिंधुदुर्ग | कृष्णा ढोलम, सहाय्यक संपादक (वृत्त) : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा उघड केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'सहकार पॅनल'ने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या 'परिवर्तन पॅनल'चा पराभव करत २१ पैकी १६ जागांवर विजय मिळवला. या निकालानंतर आता लक्ष लागून आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडे. आगामी होऊ घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतही एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण असा सामना रंगणार का ? याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ठाणे -पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हितेंद्र ठाकूर, भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल निवडणूक रिंगणात उतरले होते. बँकेच्या 21 संचालक पदांपैकी 10 संचालक बिनविरोध निवडून आले होते. त्यात 10 पैकी 8 संचालक हे सहकार पॅनलचे होते. तर 11 संचालक पदासाठी निवडणूक झाली. बहुमतासाठी सहकार पॅनलला 3 जागांची आवश्यकता होती. त्यामुळे उर्वरित 11 संचालक पदासाठी चुरशीची निवडणूक झाली. शिंदेंच्या सहकार पॅनल विरुद्ध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे परिवर्तन पॅनल होते. परिवर्तन पॅनल निवडून येण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मजबूत फिल्डिंग लावली होती. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. या निवडणूक निकालात एकनाथ शिंदे यांच्या 'सहकार पॅनलने' रवींद्र चव्हाण यांच्या 'परिवर्तन पॅनलचा' पराभव केला. 

तर याचं निवडणुकीत दोन मातब्बर नेत्यांच्या पॅनल विरोधात निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. या प्रस्थापितांच्या लढतीमध्ये दोन मुख्य पॅनलमध्ये स्थान न मिळालेल्या निलेश सांबरे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विक्रमगड तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघातून निलेश सांबरे यांनी प्रस्थापितांना धुळ चारत विजय संपादन केला. निवडणुकीपूर्वी ज्या प्रस्थापितांनी निलेश सांबरे यांना आपल्या पॅनेलमध्ये स्थान देण्यास नकार दिला होता, त्याच प्रस्थापितांना या निकालाने सांबरेंनी आपली ताकद दाखवून दिली. पाठीशी कोणत्याही मोठ्या पॅनेलचा किंवा राजकीय गॉडफादरचा आधार नसतानाही, सांबरे यांनी स्वतःच्या बळावर मोठा विजय मिळवला.

ठाण्याच्या या निवडणूक निकालानंतर आता चर्चा सुरु झाली आहे ती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची. आगामी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक होऊ घातली आहे. गत निवडणुकीत रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यात ठाण मांडून पूर्ण 'ताकद' लावली होती. रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा विशेष लक्ष जिल्ह्यावर असतो. आता ते प्रदेशाध्यक्ष असल्याने प्रत्येक निवडणुकीत बारकाईने लक्ष ठेऊन असतात. लोकसभा, विधानसभे सहित नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. त्यात जिल्ह्यात मंत्री नितेश राणे, प्रमोद जठार हे भाजपाचे दोन आमदार आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेन जिल्ह्यात आपले राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. शिवसेनेचे दोन आमदार आहेत. आमदार निलेश राणे हे आक्रमकपणे आपली संघटना वाढवत आहेत. तर दीपक केसरकर हे शांत राहून संघटना वाढवत आहेत. 

जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता, ती महायुतीतील प्रभाव, नेतृत्व आणि राजकीय ताकदीची परीक्षा ठरू शकते. जिल्हा बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. शेतकरी, सहकारी संस्था, ग्रामीण विकासाशी या बँकांचा थेट संबंध असतो. त्यामुळे जिल्हा बँकेवर नियंत्रण म्हणजे केवळ आर्थिक संस्था नव्हे, तर ग्रामीण राजकारणावर प्रभाव प्रस्थापित करण्याचे प्रभावी साधन मानले जाते.

त्यामुळे आता सर्वांचे लक्ष सिंधुदुर्गकडे लागले आहे. ठाणे-पालघरचा निकाल हा केवळ एका जिल्हा बँकेचा निकाल होता की महायुतीतील भविष्यातील संघर्षाची नांदी? याचे उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मिळू शकते. कारण लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत  निवडणुकीत शिवसेना भाजपामध्ये जागा वाटपावरून बिनसले होते. मालवण नगरपरिषद निवडणुकीत तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्ण 'ताकद' लावली होती. शिवसेना भाजपामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. राज्यभरात त्याची चर्चा झाली होती. या संघर्षात आमदार निलेश राणे यांनी भाजपाला धूळ चारत नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन केली. तर कणकवली नगरपंचायत निवडणुकीचीही जबाबदारी निलेश राणे यांच्याकडे होती. निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीला पाठिंबा देत तिथेही भाजपला दणका दिला होता. त्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीत सिंधुदुर्गमध्ये मैत्री टिकणार की ठाणे- पालघरप्रमाणे पुन्हा "शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण" अशी थेट लढत पाहायला मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.