LIVE UPDATES

सत्यशोधकच्या 'त्या' बॅनरने फिरणार प्रांतांच्या विरोधातलं वातावरण..?

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 11:41 AM
views 322  views

कणकवली : प्रांत अधिकारी कातकर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. लोकांना प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी चालत नाही. तुम्ही या जिल्ह्यात आल्यापासून नायब तहसिलदार ते प्रांताधिकारी या प्रवासात खूप गोरगरीब कष्टकऱ्यांची कामे केली आहेत. गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला हवे आहात. जिल्ह्यात जवळपास २०० प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. तर काही शाळा बंद पडल्या आहेत. गोरगरीब विद्यार्थी शिक्षणातून हद्दपार होत आहेत. त्यांचं कोणालाच सोयर सुतक नाही. अशा आशयाचा बॅनर सत्यशोधक सेक्युलर फ्रंट मार्फत कणकवली प्रांत कार्यालयासमोर लावण्यात आला आहे.

कणकवली प्रांताधिकारी यांच्या विरोधात प्रशिक्षण दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्या संदर्भात शिक्षकेत्तर कर्मचारी व संघटना यांनी काल प्रांत कार्यालयासमोर आंदोल करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तसेच त्यांनी माफी मागावी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या संघटनांनी केली होती.

प्रशिक्षणा दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्या संदर्भात प्रांत अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र देऊन दिलगिरी देखील व्यक्त केली होती. पण त्यानंतर देखील शिक्षक संघटना व अन्य कर्मचाऱ्यांनी यावर समाधान व्यक्त न झाल्याने त्यांनी आमची माफी मागावी असे सांगत वक्तव्याचा निषेध व्यक्त करत BLO च्या कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले.

पण आज  प्रांत अधिकारी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत त्यांच्या समर्थनार्थ बॅनर आता कणकवलीत लावण्यात आले असून नेमके पुढे काय होते हे देखील पहावे लागणार आहे.