LIVE UPDATES

पीक पाहणीच्या कामातून पोलीस पाटलांना वगळा

वैभववाडी पोलीस पाटील संघटनेचे तहसीलदारांकडे निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 12:56 PM
views 15  views

वैभववाडी : ई पीक पाहणीच्या कामातून पोलीस पाटील यांना मुक्त करावे अशा मागणीचे निवेदन वैभववाडी पोलीस पाटील संघटनेने तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  शासनाच्या आदेशानुसार पीक पाहणीचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. मात्र सध्या हे काम पोलीस पाटील यांच्याकडून करून घेतले जात असल्याने संघटनेचा याला विरोध आहे. तसेच पोलीस पाटील हे गावपातळीवरील मानाचे व प्रतिष्ठेचे पद असून त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मधील तरतुदींनुसार पोलीस पाटील यांच्याकडून महसूल विभागाची कामे करून घेणे योग्य नाही.

महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार महसूल पाटलांची पदे रद्द करण्यात आली असून त्यांची महसूलविषयक जबाबदारी तलाठ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पीक पाहणीसारखी महसुली कामे पोलीस पाटील यांच्याकडून करून घेणे शासनाच्या धोरणाशी विसंगत आहे.तसेच शासनाच्या परिपत्रकात पीक पाहणीसाठी सहाय्यक नेमण्याबाबत उल्लेख असून त्यामध्ये पोलीस पाटील यांचा समावेश नाही.त्याचबरोबर शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करताना सर्पदंश, वन्यप्राण्यांचा धोका तसेच जमिनीच्या वादातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे

पोलीस पाटील यांना पीक पाहणीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे  केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत बोडके, जिल्हा सचिव राखी पवार ,तालुकाध्यक्ष  राजेंद्र रावराणे, सचिव सुनील कांबळे, राज्य संघटक औदुंबर तळेकर राज्य संघटक यासह संघटनेचे पदाधिकारी व पोलिस पाटील उपस्थित होते.