LIVE UPDATES

कुडाळ वेताळबांबर्डे अपघाती वळणाचं काम अजूनही अर्धवट

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 12:15 PM
views 93  views

कुडाळ : वेताळबांबर्डे येथील अत्यंत धोकादायक आणि अनेक निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या अपघाती वळणाचा तिढा अनेक वर्षांनंतर सुटला खरा, पण आता ठेकेदाराच्या बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारामुळे हे काम पुन्हा एकदा अधांतरी सापडले आहे. खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांनी वैयक्तिक लक्ष घालून, मध्यस्थी करत हा वर्षानुवर्षांचा गंभीर प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. मात्र, आता काम अर्धवट टाकून पळ काढणाऱ्या मुजोर ठेकेदाराला जनतेच्या जिवाशी खेळण्याची 'मस्ती' आली आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.

वेताळबांबर्डे येथील हे वळण वाहनचालकांसाठी नेहमीच 'काळ' ठरले आहे. खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे जेव्हा येथे प्रत्यक्षात काम सुरू झाले, तेव्हा प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या जीवात जीव आला होता. आता या मृत्यूच्या सापळ्यातून कायमची सुटका होईल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, ठेकेदाराला हे काम पूर्ण करण्यात काडीचाही रस नसल्याचे सद्यस्थितीवरून स्पष्ट दिसत आहे. काम अर्धवट अवस्थेत ठेवून ठेकेदाराने काढता पाय घेतल्याने परिस्थिती 'आसमान से टपके और खजूर पे अटके' अशी झाली आहे.

सर्वात मोठा धक्कादायक प्रकार म्हणजे, डोळ्यांदेखत जनतेचा जीव टांगणीला लागलेला असताना 'सार्वजनिक बांधकाम विभाग' (PWD) या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. ठेकेदाराच्या या मनमानी कारभारावर अधिकाऱ्यांचा वचक का नाही? की बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांचे काही साटलोटं आहे? हा आता सर्वसामान्यांसाठी मोठ्या अभ्यासाचा आणि संशयाचा विषय बनला आहे.

सद्यस्थितीला या अर्धवट कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा कोणताही ठोस उपाय केलेला नाही. रस्त्याच्या अगदी मध्यभागी बॅरिकेट्स उभे करून ठेवण्यात आले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस आणि दाट अंधारामुळे हे बॅरिकेट्स वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. अशा स्थित्रीत एखादी मोठी दुर्घटना घडली किंवा कोणाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग की तो मुजोर ठेकेदार?

खासदार आणि आमदारांनी केलेल्या प्रयत्नांना हरताळ फासणाऱ्या या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः ढिम्म अवस्थेतून बाहेर पडून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जर हे वळण तातडीने दुरुस्त केले नाही आणि येथे एखादा भीषण अपघात झाला, तर संतप्त जनता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढेल, असा इशारा ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी दिला आहे.