
सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानकासमोरील रस्त्यावर झालेल्या एका विचित्र अपघातात एक पादचारी युवक गंभीर जखमी झाला आहे. शिवशाही बसने धडक दिल्याने हा अपघात घडला. उल्हास सुरेश कोरगावकर (वय ३९, राहणार - कोलगाव) असे या अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी बस स्थानकातील मेकॅनिक चालक संदेश अकलेकर हे रात्री १०.३० वाजताच्या सुमारास 'शिवशाही' बस (क्रमांक MH 09 FL 0475) दुरुस्तीनंतर ट्रायल करण्यासाठी शहरात घेऊन जात होते. बस आगारातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर स्टॅन्डसमोर टर्न मारत असताना, तेथून जाणारे पादचारी उल्हास कोरगावकर यांना या बसच्या पाठीमागील बाजूची जोरदार धडक बसली. या धडकेमुळे कोरगावकर हे रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि आगारातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी जखमी उल्हास कोरगावकर यांच्या आईने सावंतवाडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मेकॅनिक चालक संदेश अकलेकर यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.












