LIVE UPDATES

कोकण कट्टाच्या माणुसकीच्या भिक्षा फेरीतून गरजूंना प्रेमाचा घास

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 06, 2026 21:21 PM
views 34  views

मुंबई : समाजातील गरजू आणि निराधार घटकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या विलेपार्ले येथील कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेने माणुसकीचा अनोखा उपक्रम राबवत साई आधार संस्थेला जीवनावश्यक वस्तूंची मोठी मदत केली आहे.

विलेपार्ले येथील कोकण कट्टाच्या वतीने साई आधार या निराधारांचा आधार बनलेल्या संस्थेला तब्बल दोन हजार किलो तांदूळ, दोनशे किलो डाळ, तसेच मुलांसाठी बिस्किटे, फरसाण, केक, वॉटर बॉटल आणि उत्तम दर्जाची पेन यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला विलेपार्ले येथील श्री स्वामी समर्थ मठाचे विशेष सहकार्य लाभले.

साई आधारच्या निवासस्थानी जाऊन ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी कोकण कट्टा संस्थापक अजित दादा पितळे, दादा गावडे, सुजित कदम, प्रभाकर फणसेकर, जयेश बंदरकर, सचिन दिवाळे, राजू चव्हाण आणि आत्माराम डिके यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी सेवाकार्यात सहभाग घेतला.

यावेळी केवळ धान्यवाटप न करता मुलांशी संवाद साधत त्यांना खाऊ व आवश्यक साहित्य देण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. त्यांच्या आनंदाला जणू सागराचे रूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोकण कट्टाच्या वतीने भविष्यात ग्राम संवर्धन, पेण आणि मोखाडा येथील सह्याद्री संस्था यांनाही धान्य व अन्य मदतीचे साहित्य देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमानंतर कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, अध्यक्ष विवेक वैद्य तसेच साई आधारचे विशाल परुळेकर यांनी या सेवाकार्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व दानशूर नागरिकांचे आभार मानले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.