LIVE UPDATES

जखमी नागाला जीवदान

Edited by: लवू परब
Published on: June 06, 2026 19:53 PM
views 56  views

दोडामार्ग :  सासोली परिसरात गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या नागाला वनविभाग व रॅपिड रेस्क्यू टीमने नवजीवन दिले. काही दिवसांच्या उपचारांनंतर त्याची प्रकृती पूर्णपणे सुधारल्याने शुक्रवारी त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी सासोलीच्या मुख्य मार्गावर एक नाग रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याचे स्थानिक वन्यजीवप्रेमी सर्वेश पेडणेकर यांच्या निदर्शनास आले. याची माहिती मिळताच वनविभाग आणि रॅपिड रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून जखमी नागाची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. योग्य उपचार आणि देखभालीमुळे नागाच्या सर्व जखमा भरून आल्या व त्याची प्रकृती पूर्ववत झाली.

नाग पूर्णपणे बरा झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्याला जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, दोडामार्ग तालुक्यात वनविभागाची रॅपिड रेस्क्यू टीम २४ तास कार्यरत असून जखमी अथवा संकटात सापडलेल्या वन्यजीवांची माहिती नागरिकांनी त्वरित वनविभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.