
सावंतवाडी : मडूरा येथे स्ट्रीट लाईटच्या पोलवर बल्प लावण्यासाठी चढलेल्या सागर केरकर यांचा शॉक लागून अपघात झाला. यात त्याची उजवी बाजू कमकुवत झाली असून घरातील एकमेव कमावता अंथरूणावर खिळल्याने तसेच पोलिस, पोलिस पाटील, स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने दाद मागायची कोणाकडे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आजारी आई-वडील, लहान मूलं पदरात असल्याने जीवाचे बरवाईट करण्याची मानसिकता त्यांची व पत्नी सेजल केरकर हीची झाली होती. याचे वृत्तांकन 'कोकणसाद'च्या माध्यमातून करण्यात आल्यानंतर स्वतः पालकमंत्री नितेश राणे यांनी त्याची दखल घेत त्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले आहे.
पालकमंत्री नितेश राणेंनी त्या कुटुंबाशी संपर्क करून विचारपूस करत मदतीचा शब्द त्यांना देत आधार दिल्याने केरकर कुटुंबाला मोठा धीर मिळाला आहे. कोकणसाद LIVE ची बातमी प्रसिद्ध होताच पालकमंत्री श्री. राणे यांनी त्यांची दखल घेतली. यानंतर थेट
केरकर कुटुंबाशी संपर्क करत त्यांची परिस्थिती जाणून घेऊन त्यांना धीर दिला. त्यांना जितका खर्च हॉस्पिटलसाठी झाला आहे तितकी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून करून देण्यासह सोमवारी त्यांना बोलवून घेतल आहे. पुढील उपचारासाठी अधिकची मदत करण्यासाठीची कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी फोनवरून स्वतः संपर्क करून त्या कुटुंबाची विचारपूस करत त्यांना धीर दिला. त्यांना मदतीचा शब्द देत आपण पाठीशी असल्याचे सांगितले. त्यामुळे खचलेल्या केरकर कुटुंबाला आधार मिळाला असून याबद्दल केरकर कुटुंबाने मंत्री नितेश राणेंचे आभार व्यक्त केलेत.












