LIVE UPDATES

धाटाव MIDC मध्ये खळबळ

NEELIKON कंपनीसमोर रसायनमिश्रित पाणी रस्त्यावर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 29, 2026 16:24 PM
views 47  views

CETP यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह

रायगड : धाटाव औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा धक्कादायक चित्र समोर आले आहे. NEELIKON कंपनीसमोरील सांडपाण्याच्या चेंबरमधून डिझेलसदृश रसायनयुक्त दूषित पाणी बाहेर पडताना दिसून आले. मुसळधार पावसामुळे चेंबर तुडुंब भरून वाहत असून घातक रसायनमिश्रित पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने कामगार, वाहनचालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, दर पावसाळ्यात असेच दृश्य अनेक ठिकाणी दिसत असताना, सीईटीपी (CETP) यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही कंपन्या पावसाचा आडोसा घेत रासायनिक दूषित पाणी बाहेर सोडत असल्याचा संशय वारंवार व्यक्त केला जातो. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, काही बेजबाबदार कंपन्या पहिल्या पावसाची वाटच पाहत असतात का?

याहून गंभीर बाब म्हणजे, दरवर्षी सीईटीपीमध्ये अशा त्रुटी का उद्भवतात? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. आधीच रासायनिक प्रदूषणामुळे नाले, ओढे आणि जलस्रोत दूषित होत आहेत. जलचर जीवांचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेक वेळा मासे मृतावस्थेत आढळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

प्रदूषण नियंत्रणासाठी स्थापन केलेली यंत्रणा नेमकी किती प्रभावी आहे? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार की केवळ कागदोपत्री नोटिसांचा खेळ सुरू राहणार? सीईटीपीचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार की पुन्हा एकदा "जैसे थे" भूमिका घेणार, याकडे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पर्यावरणाशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांनाही तितकेच जबाबदार धरले पाहिजे. अन्यथा पावसाचा प्रत्येक थेंब हा प्रदूषण लपविण्याचे साधन ठरत राहील आणि त्याची किंमत निसर्गासह सर्वसामान्य नागरिकांनाच मोजावी लागेल.