
सावंतवाडी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूसह एका चारचाकी गाडीचा समावेश आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूसह तब्बल ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सावंतवाडी येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. यात अनिश पांगम (वय २७, रा. सावंतवाडी) अजित मठकर (वय ३९, रा. सावंतवाडी) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून ही कारवाई केली. संशयित चारचाकी वाहनाची झडती घेतली असता, त्यात गोव्याहून आणलेली बेकायदेशीर दारू आढळून आली. गोवा बनावटीची दारू रु. २ लाख ७३ हजार ८४०/- व चारचाकी गाडी रु. ९ लाख असा एकुण ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींवर बांदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(a), (e), ८१, ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांच्या पथकाने केली.











