
सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव येथे महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, पुणे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेला 'संविधान मूल्यांवर आधारित बाल आनंद मेळावा' उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि संस्कारमय वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि पर्यावरण संवर्धन यांसारखी मूल्ये बालमनात रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिक्षणासोबत आनंदाची अनोखी पर्वणी अनुभवली.
या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजन मासूमच्या फेलो फिजा मकानदार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. त्यानंतर विविध ओळखपर उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये मैत्री, संवादकौशल्य आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यात आली. यावेळी फिजा मकानदार यांनी भारतीय संविधानाची ओळख करून देताना संविधान म्हणजे काय, त्याची निर्मिती का झाली, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे स्थान काय आहे तसेच प्रत्येक नागरिकाचे हक्क आणि कर्तव्ये कोणती, याविषयी मुलांना अतिशय सोप्या, खेळकर आणि प्रभावी शैलीत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांपैकी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संकल्पना विविध खेळ, गाणी, संवाद आणि कृतींच्या माध्यमातून मुलांसमोर जिवंत केल्या. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे मुलांनी संविधानातील मूल्यांचा केवळ अभ्यासच केला नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला.
यावेळी सामिल नाईक यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत निसर्गाचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी मुलांना केले. कार्यक्रमात वासंती परुळेकर, अनविता जाधव आणि महिमा कदम यांनी सादर केलेल्या "समतेच्या वाटेने" या गीताने उपस्थितांना भारावून टाकले. त्यानंतर "आईचं पत्र हरवलं" हा सहभागात्मक खेळ घेण्यात आला. या उपक्रमातून समता, सहकार्य, परस्पर आदर, बंधुता आणि सामूहिक जबाबदारी यांसारख्या संविधानिक मूल्यांचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात सामाजिक कार्यकर्ते जयराम जाधव यांनी मुलांसोबत गाणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक उपक्रम घेत वातावरणात आणखी उत्साहाची रंगत भरली. दिवसभर चाललेल्या शैक्षणिक, बौद्धिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये मुलांनी मनमुराद सहभाग घेत आनंदोत्सव साजरा केला. खेळ, गाणी, संवाद, कृती आणि संस्कार यांची सुंदर सांगड घालत भारतीय संविधानाची मूल्ये बालमनात रुजवणारा हा बाल आनंद मेळावा उपस्थितांसाठी प्रेरणादायी, संस्मरणीय आणि दिशादर्शक ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभिजित सावंत, भाविका कदम, नासिर मकानदार, श्रुती सावंत, रोहित पेडणेकर आणि मिताली राऊळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.










