
देवगड : वटपौर्णिमेच्या पवित्रदिनी देवगड तालुक्यातील दहीबाव, कोटकामते, लिंगडाळ येथे सुवासिनींनी मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि पारंपरिक पद्धतीने वडाच्या वृक्षाची पूजा करून व्रताचे पालन केले. सकाळपासूनच परिसरातील सुवासिनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाजवळ एकत्र आल्या होत्या.
यावेळी सुवासिनींनी वडाच्या वृक्षाला हळद, कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण करून पवित्र दोरा गुंडाळत सात फेरे मारले. पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा, अशी मनोभावे प्रार्थना त्यांनी केली.
भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. पतीव्रता सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि निष्ठेच्या बळावर पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळविल्याच्या स्मरणार्थ हे व्रत पाळले जाते. त्यामुळे हे व्रत अखंड सौभाग्य, कौटुंबिक सुख आणि पती-पत्नीतील दृढ नात्याचे प्रतीक मानले जाते.
यावेळी दहीबाव येथील एसटी स्टॉप , नजिक असलेल्या वटवृक्षाचे , दहिबाव येथील दहिबावकरवाडी येथे असलेल्या कोटकामते, लिंगडाळ परिसरात असलेल्या वडाच्या वृक्षांचे पूजन करण्यात आले. सुवासिनींनी पारंपरिक रीतीरिवाजांचे पालन करत वटपौर्णिमेचा उत्सव उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा केला.










