LIVE UPDATES

मुलाखतीतून उघडले यशाचे रहस्य

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 24, 2026 20:02 PM
views 35  views

देवगड : देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचलित शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथील मराठी विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी येथील अधिव्याख्याता डॉ. लवू बाजीराव आचरेकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीतील ३६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मुलाखत घेतली. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांनी डॉ. लवू आचरेकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

विद्यार्थ्यांनी शिक्षक होण्याचा प्रवास, अध्यापनातील अनुभव, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, वाचनाचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकास, तसेच भविष्याच्या संधी यांसारख्या विविध विषयांवर प्रश्न विचारले. डॉ. लवू आचरेकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देत कठोर परिश्रम व संघर्षातूनच उद्याचे भविष्य उज्चल आहे, सकारात्मक विचार करावा, अभ्यासात सातत्य असावे , ज्या कामातून आत्मिक समाधान मिळते तेच खरे यश आहे, पालकांचा आपल्या पाल्याशी सातत्यपूर्ण संवाद असला पाहिजे , जिज्ञासू वृत्ती, स्पर्धा परीक्षेचे महत्त्व, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रेम ,आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांच्या हस्ते डॉ. लवू आचरेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

या संवादातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ज्ञान, अनुभव आणि मुलाखत घेण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात निश्चितच उपयोगी ठरणार  असल्याचे  मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांनी असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमामुळे शाळेत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण झाले . या कार्यक्रमासाठी आफरीन पठाण , निशा दहिबावकर, रोहित बांदिवडेकर व ज्ञानेश्वर कुंभरे यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर कुंभरे व विद्यार्थिनी ओवी बापट यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी संस्था पदाधिकारी, संस्थाचालक मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.