
सावंतवाडी : दादर येथील शिवभवन येथे महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी श्रीवल्ली प्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील संघटनात्मक परिस्थिती आणि आगामी निवडणुकांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना स्वबळावर निवडणूक लढवण्याची आहे.
ही भावना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रभारी श्रीवल्ली प्रसाद यांच्यासमोर मांडली. आगामी विधानपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवरही चर्चा झाली असून पक्षाने काही उमेदवार जाहीर केल्याची माहिती कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी दिली आहे.
याचबरोबर भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, अशी ठाम भूमिका प्रभारी श्रीवल्ली प्रसाद जी यांच्यासमोर मांडली. स्वबळावर लढणे ही केवळ राजकीय भूमिका नाही, तर काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीची गरज आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आघाडीच्या राजकारणामुळे अनेक ठिकाणी काँग्रेसची स्वतंत्र संघटनात्मक ताकद आणि पक्षाचे चिन्ह कमकुवत झाले आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसने स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवल्या, त्या ठिकाणी कार्यकर्ते सक्रिय राहिले, संघटना मजबूत झाली आणि पक्षाचा जनाधार टिकून राहिला. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा स्पष्ट निर्णय घेतल्यास प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता गावागावात, बूथपर्यंत आणि तळागाळापर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागेल. या अनुषंगाने प्रभारी श्रीवल्ली प्रसाद यांच्यासोबत माझी सुमारे अर्धा तास सविस्तर बैठक झाली.
या बैठकीमध्ये कोकणातील काँग्रेसची संघटनात्मक परिस्थिती, गेल्या काही वर्षांपासून संघटनेसमोर असलेल्या अडचणी, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली. सिंधुदुर्ग आणि कोकणात काँग्रेसला नव्याने उभारी देण्यासाठी मजबूत, सातत्यपूर्ण आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेणारे नेतृत्व व संघटनात्मक नियोजन आवश्यक आहे, ही भूमिका मी स्पष्टपणे मांडली.
आगामी काळात काँग्रेसला केवळ निवडणूक लढवणारा पक्ष नव्हे, तर स्वतःच्या संघटनात्मक ताकदीवर विजय मिळवण्याची क्षमता असलेला पक्ष बनवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पक्षाचे वरिष्ठ प्रदेशच्या नेत्यांनी आश्वासित केले आहे 2029 च्या विधानसभा ह्या स्वबळावर होणार असल्याने त्याची पूर्व तयारी ही आता पासून होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्यातील येणाऱ्या चार नगरपंचायती सुद्धा आपण स्वबळावर लढू त्यासाठी सर्व तालुका स्तरावर तयारी सुरु करावी.स्वबळावर लढण्यामागे उद्दिष्ट संघटनात्मक आहे निवडून आल्यानंतर सत्ता स्थापन ही इंडिया आघाडी बरोबर समविचारी पक्षांबरोबर स्थानीक लेवलला प्रदेश काँग्रेस च्या विचारांनीच करण्यात येणार असल्याचे सौ. वंजारी यांनी म्हटले आहे.











