LIVE UPDATES

गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती

वृद्धाला २ लाखाला गंडवल | आरोपीच्या झारखंडमध्ये आवळल्या मुसक्या
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 18:55 PM
views 42  views

सावंतवाडी : “तुमचे गॅस कनेक्शन बंद होणार आहे” अशी भीती दाखवत ओरोस येथील एका वृद्धाची तब्बल २ लाख ३८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर फ्रॉड प्रकरणातील आरोपीला सावंतवाडी पोलिसांनी थेट झारखंडमध्ये जाऊन जेरबंद केले. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांना मोठा दणका बसला असून पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या धाडसी तपासाचे कौतुक होत आहे.

गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगून संबंधित वृद्ध व्यक्तीला विश्वासात घेत सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून तब्बल २ लाख ३८ हजार ५०० रुपये हडपले होते. घटना समोर आल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सायबर गुन्ह्याचा माग काढताना पोलिसांसमोर आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस प्रमोद पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासाची दिशा झारखंडपर्यंत पोहोचताच पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. अखेर झारखंडमध्ये जाऊन आरोपीला जेरबंद करण्यात सावंतवाडी पोलिसांना यश आले. या कारवाईत प्रमोद पाटील, हेड कॉन्स्टेबल श्री. शिंगाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

स्थानिक पातळीवर घडलेल्या सायबर फसवणुकीचा तपास थेट झारखंडपर्यंत नेऊन आरोपीला अटक करण्याची ही कारवाई पोलिसांच्या तपासकौशल्याची आणि धाडसाची प्रचिती देणारी ठरली आहे. गुन्हेगार कितीही दूर लपला, तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, असा संदेश या कारवाईतून मिळाला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत. विशेषतः वृद्ध नागरिकांना फोन करून गॅस कनेक्शन, बँक खाते, केवायसी, वीज बिल अशा विविध कारणांचा आधार घेत फसवणूक करणाऱ्या सायबर टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.