
बॅ. नाथ पै सेवांगणच्यावतीने मनमित्रचं आयोजन
कुडाळ : कुमारवयीन विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक व सामाजिक बदलांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मनोविकार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी केले.

बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने “कुमारवयीन मुलांचे भावनिक आरोग्य रक्षण – मनमित्र” या उपक्रमांतर्गत शनिवार, १५ ऑगस्ट रोजी पाट हायस्कूल येथे शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात पाट हायस्कूल, परुळे हायस्कूल, माड्याची वाडी हायस्कूल आणि केळूस हायस्कूल येथील शिक्षक सहभागी झाले होते.
सत्राच्या प्रारंभी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भावनिक व मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्नावली देण्यात आली. त्यानंतर गटचर्चेद्वारे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, त्यांच्या संभाव्य कारणांचा आणि अशा परिस्थितीत शिक्षकांची भूमिका यावर विचारमंथन करण्यात आले.
डॉ. पाटकर यांनी कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखणे, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्यांच्या समस्या कमी लेखू नये आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत घ्यावी, यावर भर दिला. विद्यार्थ्यांमध्ये ताण, निराशा, अपयश, नकार, कौटुंबिक अपेक्षा, नातेसंबंधातील गुंतागुंत, एकटेपणा आणि संवादाचा अभाव यांसारख्या बाबींचा भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार निर्माण होण्यामागील संभाव्य कारणे आणि अशा टोकाच्या परिस्थितीला प्रतिबंध करण्यासाठी शिक्षकांनी घ्यावयाची काळजी यावरही विशेष चर्चा झाली. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि विश्वासाचे वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांना निःपक्षपातीपणे ऐकून घेणे आणि योग्य वेळी मदत मिळवून देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
नकार स्वीकारण्याची क्षमता, अपयश व निराशेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे असल्याचेही डॉ. पाटकर यांनी स्पष्ट केले. प्रत्येक मागणीला होकार देण्याऐवजी योग्य वेळी ‘नाही’ स्वीकारण्याची सवय मुलांना लागणे आवश्यक आहे. तसेच वस्तूंची किंमत समजण्याबरोबरच पालकांचे कष्ट, प्रयत्न आणि त्याग यांचे भावनिक मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कुमारवयात निर्माण होणारे आकर्षण, मैत्री, प्रेम आणि भावनिक अवलंबित्व यातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भावनेच्या भरात टोकाचे निर्णय न घेता स्वतःच्या भावनांना ओळखणे, समजून घेणे आणि योग्य पद्धतीने हाताळणे ही भावनिक बुद्धिमत्तेची महत्त्वाची कौशल्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर, डॉ. रुपेश पाटकर, मुक्तांगण, वेंगुर्ल्याच्या संचालिका मंगल परुळेकर, सेवांगणचे कार्योपाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, सचिव खोबरेकर तसेच एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाटचे संस्था सदस्य राजेश सामंत उपस्थित होते.
संपूर्ण सत्र संवादात्मक व विचारप्रवर्तक पद्धतीने पार पडले. शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपणे ही केवळ पालकांची किंवा विद्यार्थ्यांची जबाबदारी नसून शाळा, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
“मनमित्र” उपक्रमातील या मार्गदर्शन सत्रामुळे कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या वेळीच ओळखून त्यांना योग्य आधार देण्यासाठी शिक्षकांना निश्चितच उपयुक्त दिशा मिळाली.










