LIVE UPDATES

माजगाव येथे शहीद नौसैनिक शुभम सावंत यांच्या पुतळ्याचे अनावरण

स्वातंत्र्य दिनी वीर माता-पिता व वीरपत्नींचा सत्कार
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 18:38 PM
views 55  views

सावंतवाडी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माजगाव येथे शहीद नौसैनिक शुभम उदय सावंत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. माजगाव ग्रामपंचायतीच्या पटांगणावर हा कार्यक्रम संपन्न झाला.

शहिद‌ सैनिक शुभम सावंत यांना १२ ऑक्टोबर २०१४ रोजी वीरमरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी आणि वीर माता-पिता यांचा विशेष गौरव व सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्धात मोलाचे योगदान दिलेले निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा तसेच भारतीय सैन्याच्या आर्मी एअर डिफेन्स अंतर्गत 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये यशस्वी नेतृत्व केलेले निवृत्त सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सुभेदार मेजर संजय सावंत म्हणाले, देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करणारे खूप कमी लोक आहेत. स्वातंत्र्य दिनी त्यांच्या समर्पणाचे स्मरण केले गेले. येणाऱ्या पिढीला देशसेवेसाठी हा आदर्श ठरेल असे ते म्हणाले. वीरत्व येण अभिमानाची गोष्ट आहे. ८० वर्षांपूर्वी आपणास स्वातंत्र्य प्राप्त झाले. आजच्या दिनी शहिद शुभम सावंत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच वीर माता पित्याचा, वीर पत्नीचा सन्मान करण्यात आला. आजच्या पिढीने स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. वीरत्व येण ही सौभाग्याची गोष्ट आहे. जीवन मरण आपल्या हातात नाही. त्यामुळे घाबरून न जगता धीरोदात्तपणे जगा, देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करा असे आवाहन डॉ. सिन्हा यांनी केले. यावेळी माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रंजना कानसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, संजय कानसे, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.