
सावंतवाडी : आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सावंतवाडी शहरात मंजूर झालेल्या ओपीडी संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडून दिरंगाईसह ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामात कसूर केलेल्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करण्यासह पाणी पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांचे तात्काळ निलंबन करण्यासह प्र. मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी आदी मागण्यांसाठी नगरसेवक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन छेडल आहे.
सुर्याजी म्हणाले, नळपाणी योजनेच काम चुकीच झालं असुन जिल्हाधिकारी आलेल्या असताना आम्हाला बोलवलं नाही. जनतेच्या प्रश्नांना नगरपरिषद न्याय देत नसून आयुष मंत्रालय भारत सरकारची ओपीडी आज सुरु होण आवश्यक असताना ती अद्याप झालेली नाही. याचा ठराव देखील सर्वानुमते मंजूर झाला आहे. ३ महिने कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झाली नसून मुख्याधिकाऱ्यांकडून याला विरोध होत असल्याचे समजत आहे. लोकांना इथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार होत असताना त्यावर लक्ष नाही. या मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून लोकांनी तोंडाला काळं फासलेल आहे. लाच घेताना त्यांना पकडलं असून अशी व्यक्ती संस्थानकालीन पवित्र न.प.च्या खुर्चीत आणून बसवली आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी तसेच पाणी पुरवठा विभागात झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशा आमच्या मागण्या असून या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, सावंतवाडी नगरपरिषदेच काम बोगस पद्धतीने सुरु असून त्यामुळे ही परिस्थिती आली आहे. महायुतीत असलो तरी जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे. लोकांचे प्रश्न नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी सभागृहात मांडून देखील त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आज आंदोलना बसावं लागलं आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. शहरात होणारी दुरावस्था ही नळपाणी योजना, गॅस कंपनीकडून केलेल्या कामामुळे असून प्रशासन हाकण्यात सत्ताधारी कमी पडत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.
आंदोलना दरम्यान माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांनी भेट दिली. तसेच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी देखील आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी श्री. सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांना समोर बोलावून घ्या, लेखी स्वरूपात म्हणणं द्या त्यानंतरच आंदोलन स्थगित करण्याबाबतचा विचार करू असे स्पष्ट केले. दुपारपर्यंत मुख्याधिकारी न आल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पत्र घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. मुख्याधिकारी नाही, प्रशासकीय अधिकारी नाहीत. मग, कारभार हाकतय कोण असा सवाल उपस्थितांनी केला. तसेच जोवर मुख्याधिकारी येत नाही तोवर हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या आंदोलनाला सावंतवाडीतील विविध पक्षातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी आंदोलनकर्ते नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, उबाठा शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर, समीर वंजारी, राजू मसुरकर, रमेश सुर्याजी, विनोद सावंत, बाबल्या दुभाषी, अनिकेत पाटणकर, प्रथमेश प्रभू, दिग्विजय मुरगोड, ज्ञानेश्वर सावंत, देवेश पडते, संकल्प धारगळकर आदींसह सावंतवाडीतील नागरिक उपस्थित होते.










