LIVE UPDATES

फिरोज बाबाच्या घराची ठाणे पोलीसांकडून झाडाझडती

अजून एकाला घेतलं ताब्यात
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 14, 2026 21:09 PM
views 47  views

सावंतवाडी : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणातील तपास आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज मंगळवार १४ रोजी ठाणे येथील दोन पोलीस पथके पुन्हा एकदा कोलगाव येथील फिरोज बाबाच्या घरी दाखल झाले होती. त्यांनी फिरोज बाबाच्या संपर्कात असलेल्या एका  व्यक्तीला चौकशीसाठी आपल्या सोबत नेले आहे. त्यांनी फिरोज बाबाच्या घराची झाडाझडती घेतली तसेच त्याच्या संबंधित इतरही काही जागांचा तपास केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

माजी खासदार विनायक राऊत त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली होती. फिरोज बाबा याच्यावर तक्रारदार महिलेने तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे. त्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात आणखीन काही लोकांचा सहभाग आहे का याचाही तपास होणार आहे. आज ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला नेमके कशासाठी सोबत नेले याबाबत चर्चा सुरु आहे.