
सावंतवाडी : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. न्यायालयात त्याला हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. फिरोज बाबा याच्यावर तक्रारदार महिलेने तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे. त्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आले होते. आज त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे.










