
कुडाळ : येथील महिला व बाल रुग्णालयात सेवा देणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि सेवा समाप्तीचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मंजूर करण्यात आली असून, त्यांचे गेल्या तीन महिन्यांचे प्रलंबित असलेले ३६ लाख रुपयांचे वेतनही तात्काळ अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची (टेंडर) मुदत संपली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्ती किंवा मुदतवाढ मिळाली नव्हती. निविदा प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणींमुळे या कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे तब्बल ३६ लाख रुपयांचे वेतनही रखडले होते. ऐन महागाईच्या काळात वेतन रखडल्याने आणि नोकरीवर टांगती तलवार असल्याने कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
कर्मचाऱ्यांच्या या बिकट अवस्थेची माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी तात्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी थेट मुंबईत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्याचे आरोग्य सचिव ई. रवींद्रन यांची भेट घेऊन या गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. रुग्णालयाची आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये आणि गरिबांच्या हक्काचे वेतन रोखले जाऊ नये, यासाठी तातडीने मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी आमदार राणे यांनी केली होती.
आमदार राणे यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर वरिष्ठ प्रशासनाने ५२ कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यास हिरवा कंदील दाखवला असून रखडलेले ३६ लाख रुपये वेतनही तात्काळ वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या ही मुदतवाढ सप्टेंबरपर्यंत असली, तरी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार निलेश राणे व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू असून, याबाबतचाही धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.ऐन अडचणीच्या काळात धावून येत आपल्या रोजगाराची हमी आणि प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार निलेश राणे यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानले आहेत.










