
कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे संदेश पारकर यांचा वाढदिवस आज मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. एकीकडे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सुरु असतानाच संदेश पारकर यांनी जिल्हा दौर्यावर असलेले माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांची ओमगणेश निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नारायण राणेंच्या पत्नी सौ. नीलम राणे देखील उपस्थित होत्या. उभयतांनी पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संदेश पारकर यांची ओळख नारायण राणेंचे विरोधक अशीच होती. पण, २०१२ मध्ये त्यांनी राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, २०१४ नंतर पारकर यांनी राणेंची साथ सोडली. मात्र, पारकर यांचे राणे परिवारासोबतचे कौटुंबिक संबंध आजही तसेच आहेत, याचा प्रत्यय सातत्याने आला आहे. नगरपंचायत निवडणुकीतही आमदार नीलेश राणे हे पारकर यांच्या प्रचारासाठी कणकवलीत आले होते. तर नारायण राणे यांच्या वाढदिनी देखील पारकर यांनी ओमगणेश निवासस्थान गाठत शुभेच्छा दिल्या होत्या. आता देखील व्यस्त कार्यक्रमातून पारकर यांनी राणेंच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी ओमगणेश निवासस्थान गाठल्याने भविष्यात नेमकी काय राजकीय गणिते घडणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.










