LIVE UPDATES

एकाच कर्मचाऱ्यामुळे 'एनसीएमसी' कार्ड केंद्रावर प्रवाशांचे हाल

ताटकळत उभ्या नागरिकांना सामाजिक बांधिलकीचा आधार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 14, 2026 16:02 PM
views 82  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि पत्रकारांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा, यासाठी सध्या 'एनसीएमसी' कार्डचे वाटप सुरू आहे. मात्र, सावंतवाडी आणि बांदा या दोन मोठ्या विभागांसाठी मिळून महामंडळाने एकाच एजंटच्या माध्यमातून अवघ्या एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे कार्ड केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. यामुळे कार्ड काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांचे तीव्र उन्हात प्रचंड हाल होत आहेत. त्यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आधार दिला आहे. 

सावंतवाडी, बांदा आणि कुडाळ परिसरातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव व महिला कार्ड काढण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच केंद्रावर गर्दी करत आहेत. परंतु, केंद्रावर केवळ एकच कर्मचारी कार्यरत असल्याने कामाचा वेग अत्यंत संथ आहे. परिणामी, सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत येथे लोकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रखरखत्या उन्हात तासनतास उभे राहावे लागत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला अक्षरशः हैराण झाल्या आहेत. या रखरखत्या उन्हात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांची सुरू असलेली परवड पाहून सावंतवाडीतील 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे कार्यकर्ते तातडीने मदतीला धावून आले. प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि शेखर सुभेदार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

कार्यकर्त्यांनी थेट एजंट आणि डेपो मॅनेजरशी संपर्क साधून कडक शब्दांत जाब विचारला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी एक स्वतंत्र खोली खुली करून दिली. तसेच उन्हाने व्याकुळ झालेल्या प्रवाशांसाठी शेखर सुभेदार व रूपा मुद्राळे यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली. यामुळे ताटकळत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान, उद्यापासून ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग बांधवांचे अशा प्रकारे हाल झाले, तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे अजिबात सहन करणार नाही, असा थेट इशारा कार्यकर्त्यांनी एजंट व डेपो मॅनेजरला दिला. या इशाऱ्याची दखल घेत डेपो मॅनेजरने तातडीने संबंधित ठिकाणी तात्पुरती पत्र्याची शेड उभारण्यात येईल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बसण्यासाठी योग्य आसनव्यवस्था केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. सामाजिक बांधिलकी'च्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांना मोठा आधार मिळाला. रखरखत्या उन्हातून सुटका झाल्यामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग बांधवांनी रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व शेखर सुभेदार यांचे आभार मानले आहेत.