
कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात पार पडला. यात प्रामुख्याने उड्डाणापुलाखालील सुशोभिकरणाचाही समावेश आहे. गेल्या सहा महिन्यात आम्ही शहर विकासाचे 'प्लान' केले. आता होत असलेली भूमिपूजने ही शहर विकासाची नांदी असल्याचा आशावाद संदेश पारकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपका जाधव, जाई मुरकर, व्यापारी राजन पारकर, प्रतिथयश सुवर्णकार दीपक बेलवलकर, माजी नगरसेवक विलास कोरगांवकर आदी उपस्थित होते.
'त्यां'चे पुनर्वसनही करणार
संदेश पारकर म्हणाले, काही दिवसांपूर्वीच आम्ही नमो उद्यानाचे भूमिपूजन केले होते. आज वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक विकासकामांचे भूमिपूजन करीत आहोत. या विकासकामांची सुरुवात उड्डाणापुलापासून करत असून लवकरच सुशोभिकरण पूर्ण होईल. त्यासाठी ४० ते ५० कोटींचा निधी आवश्यक असला तरी काही निधी ताब्यात मिळाला असून कामाला सुरुवात करण्यात येईल. कणकवलीकरांनी विश्वास ठेवून सहा महिन्यांपूर्वी आमच्याकडे सत्ता दिली. त्यानुसार आज विकासाची नांदी होत असल्याचे पारकर म्हणाले. शहराचा विकास करताना काही कठोर निर्णयही घ्यावे लागतात. उड्डाण पुलाखालील विक्रेत्यांना विस्थापीत व्हावे लागणार असले तरी त्यांच्या पूनर्वसनाची जबाबदारीही आम्ही स्विकारत आहोत. भाजी मार्केटची आणखीन एक इमारत बांधण्यात येणार असून जुने भाजी मार्केटही विकसीत केले जाणार आहे. फळ, फुल, भाजी विक्रेत्यांसह स्टॉलधारकांचेही पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन पारकर यांनी दिले.
विकासगंगा सुरु राहील
गौरी पाटील म्हणाल्या, कणकवली शहर हे जिल्ह्याचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे हे शहर विकसीत होणे आवश्यक असून त्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे. संदेश पारकरांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहरात सदैव विकासगंगा सुरु राहील, असा आशावाद गौरी पाटील यांनी व्यक्त केला.
शाश्वत विकासासाठी कटीबद्ध
सुशांत नाईक म्हणाले, उड्डाणपुलाखली ४० खांब असून सुशोभिकरणासाठी १ कोटी २१ लाख प्राप्त आहेत. तर त्याव्यतिरिक्तही अनेक विकासकामांचा आम्ही शुभारंभ करत आहोत. यामध्ये गणपतीसाना सुशोभिकरणासाठी ७० लाख, क्रीडा संकुलासाठी २५ लाख, टेंबवाडी येथे पथदीपासाठी १० लाख, एलईडी स्ट्रीटलाईटसाठी २० लाख रुपये प्राप्त आहेत. शहराच्या शाश्वत विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही सुशांत नाईक यांनी दिली.










