LIVE UPDATES

माजगावात रक्तदान शिबिराला प्रतिसाद

विक्रांत सावंतांकडून माजगाव मित्रमंडळ आणि ऑन कॉल रक्तदाता संघटनेचं कौतुक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 14:22 PM
views 22  views

सावंतवाडी : जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असताना माजगाव मित्रमंडळ आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर अनेकदा जीवदान देणारे ठरणार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी केले. माजगाव मित्रमंडळ आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विक्रांत सावंत बोलत होते.

भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात झालेल्या या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर माजगाव  पंचायत समिती सदस्य जितेंद्र उर्फ जितू गावकर, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उप अधिक्षक दयानंद गवस, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, निमंत्रित सदस्य तथा भेडशी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक कमलाकर धुरी, ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी, ज्ञानेश्वर सावंत, संजय कानसे, माजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे, पडवे येथील एस. एस. पी. एम. हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी मनिष यादव आणि त्यांची टीम उपस्थित होती.

यावेळी पंचायत समिती सदस्य जितेंद्र उर्फ जितू गावकर यांनी रक्तदान हे पवित्र दान असल्याचे सांगत ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या कार्याचे कौतुक केले तसेच संस्थेच्या रक्तदान चळवळीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या रक्तदान शिबिरात महिला महिला युवक व युवतीसह एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत आणि पंचायत समिती सदस्य जितेंद्र उर्फ जितू गावकर यांचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबीराचे नियोजन गिरीश सावंत, ओंकार सावंत, सुरज सावंत, मंदार सावंत, प्रशांत मेस्त्री, शुभम रेडकर, माजगाव हायस्कूलचे कर्मचारी श्री जांभळे आदींनी  केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सूरज सावंत यांनी केले. प्रास्ताविक बाबली गवंडे यांनी केले तर आभार गिरीश सावंत यांनी मानले.