
कुडाळ : झाराप गावाचे प्रगतशील शेतकरी शरद गणपत धुरी यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. धुरी यांनी आपल्या कष्ट, जिद्द, आधुनिक शेतीचा अवलंब आणि सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेच्या बळावर केवळ झारापच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना काळात सिंधुदुर्ग LIVE ने अर्थात कोकणसाद LIVE ने आयोजित केलेल्या कृषी संवाद कार्यक्रमाचे ते ब्रँड अँबेसिडर होते.
शेती हा केवळ व्यवसाय नसून समाजाला दिशा देणारे कार्य आहे. शरद धुरी यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढ, गुणवत्तापूर्ण पीक व्यवस्थापन आणि प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना 'वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार' जाहीर केला आहे. यापूर्वीही शरद धुरी यांना राज्यस्तरीय पीक स्पर्धेतील पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, प्रगतशील शेतकरी पुरस्कार, तसेच राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर (RCF) कंपनीतर्फे प्रदान करण्यात आलेला प्रगतशील शेतकरी पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सरपंच दक्षता मेस्त्री यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, "शरद धुरी यांचा सन्मान हा केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून संपूर्ण झाराप गावासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या कार्यातून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. त्यांनी भविष्यातही कृषी क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घ्यावी, हीच सदिच्छा."
शरद धुरी यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, शेतकरी, सामाजिक संस्था आणि विविध स्तरांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, झाराप गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.










