
सावंतवाडी : शारीरिक क्षमता, जिद्द आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी प्रचिती देत स्वराज्य फिजिकल अकॅडमी, सावंतवाडीच्या पाच युवा धावपटूंनी सावंतवाडी गवळी तिठा ते आंबोली कमान हा तब्बल ३२.७ किलोमीटरचा आव्हानात्मक मॅरेथॉन प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अकॅडमीसह परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. आंबोली घाटातील चढ-उतार, पावसाळी वातावरण आणि खडतर मार्गाचा धैर्याने सामना करत या युवकांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक चिकाटी आणि संघभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडविले. ही केवळ मॅरेथॉन नव्हे, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मर्यादांवर मात करण्याचा प्रेरणादायी प्रवास ठरला. या मॅरेथॉनमध्ये आदित्य लांबेर, विनीत परब, अभिनव जाधव, सर्वेश गावडे आणि हर्ष गोसावी यांनी यशस्वी सहभाग नोंदवत संपूर्ण अंतर पूर्ण केले. त्यांच्या या कामगिरीमुळे इतर युवकांनाही नियमित व्यायाम, धावणे आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
"पर्सनल बेस्ट अचिव्हमेंट" म्हणून नोंद झालेल्या या उपक्रमामुळे स्वराज्य फिजिकल अकॅडमीने युवकांमध्ये फिटनेस, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश दिला आहे. या यशस्वी मॅरेथॉननंतर सर्व स्तरांतून सहभागी धावपटूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही अशाच साहसी आणि प्रेरणादायी उपक्रमांद्वारे अधिकाधिक युवकांनी शारीरिक तंदुरुस्तीची वाट धरावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










