LIVE UPDATES

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी मिळेना

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 07, 2026 20:15 PM
views 81  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेकडून पाणी पुरवठा योजनेचे नळ कनेक्शन मिळण्यासाठी यातना भोगून हजारो रुपये खर्च करूनही अद्याप पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्याने झिरंगवाडी म्हाडा कॉलनी येथील महिला ग्राहक स्मिता परब यांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या अनेकदा भेटी घेतल्या. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही.

झिरंगवाडी म्हाडा कॉलनी येथील स्मिता परब यांच्या घरातील पाणी कनेक्शन बंद असल्याने ते पुन्हा सुरू व्हावे, यासाठी त्या मार्च महिन्यापासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक मुरगुड यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च सांगितला होता. त्यानंतर परब यांनी स्वतः कामगार लावून नळपाणी लाईनसाठी खोदकाम करून घेतले. या नळपाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी नगरपरिषदेत अनधिकृतरीत्या ३ हजार ५०० रुपये भरले. कामगार खर्च, साहित्य आणि खोदकामासह नळ कनेक्शन जोडेपर्यंत त्यांनी आतापर्यंत एकूण १८ हजार रुपये खर्च केले आहेत. एवढा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून आणि लोकप्रतिनिधींकडे उंबरठे झिजवून अखेर नळ कनेक्शन जोडण्यात आले खरे मात्र, तरीही नळाला पाणी आलेले नाही. नगरपरिषदेच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे स्मिता परब यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. पैसे भरून आणि स्वतःच्या खर्चाने खोदकाम करूनही जर पाणी मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे ? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधारी तात्काळ लक्ष देऊन हा पाणीप्रश्न सोडवणार की या महिला ग्राहकाला आणखी यातना सहन कराव्या लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

स्मिता परब यांचे पती मुंबईत म्हाडा मध्ये नोकरीला होते. निवृत्तीनंतर ते सावंतवाडी झिरंगवाडी म्हाडा काॅलनी राहायला आले. कुटुंब मुंबईला असते ते सावंतवाडीमध्ये आले आहेत. सध्या पाणी घरात मिळत नसल्याने त्यांना हाॅटेल मध्ये राहण्याची वेळ आली आहे.  पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांचे याबाबत लक्ष वेधण्यात आले आहे.