
देवगड : कोकणातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळत असताना आता बहुचर्चित ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोटचे चेअरमन महेशराव इंगळे यांच्या सूचनेनुसार कार्यरत असलेल्या श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई) चे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या पुढाकारातून स्वामी समर्थ भक्तांना एकत्र आणत अध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई या संस्थेचे सचिव नंदकुमार पेडणेकर, दैनिक कोकणसाद, कोकणसाद लाईव्ह २४x७ टीव्ही चॅनेल आणि मालवणी अरोमा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामीभक्तासाठी या विशेष शोचे आयोजन केले असून या उपक्रमामुळे स्वामी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज रविवार, दि. ७ जून २०२५ रोजी दुपारी २.४० वाजता देवगड येथील स्टारलाईट सिनेमागृहात या चित्रपटाचा विशेष शो १०० स्वामीभक्ताना मोफत दाखविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामागे ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट श्रद्धा, अध्यात्म, समाजव्यवस्था आणि वास्तव यांचा वेध घेणारा असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर दुसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. समाजाला विचार करायला लावणारा आशय, प्रभावी कथानक आणि दर्जेदार सादरीकरण यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकणसाद समूहाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने राबविलेल्या उपक्रमांची आणखी एक नोंद झाली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजप्रबोधनास चालना देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार असून, स्वामी समर्थ भक्तांसाठी मोफत प्रवेशाची सुविधा हा उपक्रम अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवत आहे.
आयोजकांनी देवगड व परिसरातील स्वामी भक्त, चित्रपटप्रेमी आणि नागरिकांनी या विशेष शोचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे










