
कुडाळ : सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम करणारे आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचा ५० वा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस ५ जून २०२६ रोजी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ५० दीप प्रज्वलित करून आणि सुवासिनींच्या हस्ते उमेश गाळवणकर यांचे औक्षण करून झाली. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या आवारातील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी, संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक स्तरातील मान्यवरांनी केक कापून गाळवणकर यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतन केले.
या सोहळ्याला माजी आमदार वैभव नाईक, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, अमित सामंत, प्रभाकर सावंत, धीरज परब, शेखर सामंत, मनीष दाभोलकर, प्रफुल्ल वालावलकर, नकुल पार्सेकर, राजू राऊळ, प्रा. अरुण मर्गज, अमृता गाळवणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
"उमेश गाळवणकर हे शिस्त, दूरदृष्टी आणि माणुसकी यांचा सुरेख संगम आहेत. त्यांनी शून्यातून शैक्षणिक विश्व निर्माण केले असून, 'शिक्षणातून परिवर्तन' हे ब्रीद कृतीतून सिद्ध केले आहे. शासकीय व सामाजिक संस्थांना सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचे त्यांचे दानशूरपण कौतुकास्पद आहे. यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले.
सत्काराला कृतज्ञतापूर्वक उत्तर देताना उमेश गाळवणकर अत्यंत भावूक झाले. त्यांनी रेल्वे हमाल म्हणून काम करण्यापासून ते आजपर्यंतच्या आपल्या खडतर आणि संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उपस्थितांसमोर मांडली. आपण गरिबीतून वर आलो, पण गरिबीची कधी ढाल केली नाही आणि प्रसिद्धीसाठी कधी काम केले नाही.
जीवनात प्रतिकूल घटना आणि वाईट प्रसंग सतत येत असतात, पण त्याने खचून न जाता नव्या उमेदीने त्यावर मात करण्यातच खरा जीवनानंद आहे. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत आम्ही राजकारण न करता समाजसेवा केली. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले शैक्षणिक कार्य सहनशीलता बाळगून पुढे न्यायचे आहे. त्यासाठी थकायचे नाही आणि थांबायचेही नाही.
आपल्या या यशात आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सहचारिणीची समर्थ साथ महत्त्वाची असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले. या दिमाखदार सोहळ्याच्या सकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. मंदार जोशी यांनी, तर संध्याकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन अमित तेंडोलकर यांनी केले.
यावेळी गाळवणकर यांचे कुटुंबीय, रणजीत देसाई, प्रा. डॉ. नंदिनी देशमुख, डॉ. गव्हाणकर, डॉ. रवींद्र जोशी, संजय वेंगुर्लेकर, सुनील बांदेकर, गजानन कांदळगावकर, मनोज वालावलकर, जि. प. शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जि. प. सदस्य रुपेश पावस्कर, विविध वृत्तसमूहांचे पत्रकार, डॉ. स्मिता सूर्यवंशी, प्रसाद रेगे, अरुण दाभोलकर, शरद चव्हाण, डॉ. दीपाली काजरेकर, सुलभा देसाई, विठोबा सावंत, संदीप शिंदे, रणजित राणे, सौ. वालावलकर, हेमांगी नेवगी, डॉ. संजय निगुडकरी, सुनील भोगटे, मंदार शिरसाट, सुशील चिंदरकर, कुडाळ एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, राजन नाईक, प्रसाद नाईक, पिंगुळीचे सरपंच अजय आकेरकर, दशरथ राऊळ, नेरूरच्या सरपंच भक्ती घाडीगावकर आणि कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी व गाळवणकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून राजू कलिंगण यांच्या पुढाकाराने रात्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ, नेरूर यांनी 'कामदेव गर्वहरण' या बहारदार दशावतारी नाटकाचा प्रयोग सादर केला. या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.










