
सावंतवाडी : भारत सरकारच्या फिट इंडिया मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘संडे ऑन सायकल’ अभियानास सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंचायत समिती सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सायकलिंग व धावण्याद्वारे नागरिकांना तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. या अभियानाची सुरुवात तालुका स्कूल क्रमांक १ येथून सभापती सुस्मिता जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून झाली. त्यानंतर सहभागी नागरिकांनी मोती तलाव मार्गे श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्यापर्यंत सुमारे २ किलोमीटर अंतर सायकलिंग व धावून पूर्ण केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुस्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, उपअभियंता (लघु पाटबंधारे) श्री. जुवेकर, गट शिक्षण अधिकारी शेर्लेकर, बाल विकास प्रकल्प अधिकार छाया घाडीगावकर, विनायक पिंगुळकर, जितेंद्र सावंत, शुभदा सावंत तसेच पंचायत समितीचा अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी सावंतवाडी येथील मराठा करिअर अकादमीचे सुमारे १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी व उपस्थित नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत नियमित व्यायाम, सायकलिंग व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. फिट इंडिया मिशनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून नियमित शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.










