
वैभववाडी : कुर्ली येथील जागृत देवस्थान श्री कुर्ला देवीचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव (टिपर) मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाची सुरुवात ग्रामदेवतांच्या पूजेने होणार असून सकाळी ८.३० वाजता देवीच्या मूर्तीचा अभिषेक, ११.३० वाजता देवीला आभूषण अलंकार चढविणे, दुपारी १२ वाजता गणेशपूजन आणि १२.३० वाजता देवीची महापूजा होणार आहे. दुपारी १ वाजता महाआरती व सामुदायिक गाऱ्हाणे, तर १.३० वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी २ वाजता सामुदायिक लोटांगण, सायंकाळी ६ वाजता मानकऱ्यांची गाऱ्हाणी, ६.३० वाजता मानकऱ्यांच्या आणि ७ वाजता भाविकांच्या देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजल्यापासून नवस फेडणे व देवीसमोर नवस बोलण्याचे धार्मिक विधी पार पडतील.
मध्यरात्रीनंतर उत्सवाला विशेष रंगत येणार आहे. रात्री २ वाजता शिवकळा व देवराहटीच्या दिंडीचे आगमन, २.३० वाजता दीपोत्सवांतर्गत टिपर प्रज्वलन, ३.३० वाजता पाच फेऱ्यांची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता सामुदायिक गाऱ्हाणे व काकड आरतीने उत्सवाची सांगता होईल.
या वार्षिक उत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन व धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व मानकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








