LIVE UPDATES

विकासकामे प्रस्तावित करताना स्थानिक गरजा आणि जनहिताला प्राधान्य द्या

पालकमंत्री नितेश राणेंचे डोंगरी विकास समिती आढावा बैठकीत निर्देश
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 11:01 AM
views 40  views

सिंधुदुर्गनगरी :  जिल्ह्यातील डोंगरी भागांच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि मंजूर विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने डोंगरी विभाग विकास समितीची आढावा बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली.

बैठकीमध्ये सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांतील डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध निधी, मंजूर विकासकामे, त्यांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. राणे यांनी विकासकामे प्रस्तावित करताना स्थानिक गरजा आणि जनहिताला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंजूर झालेली सर्व कामे निर्धारित कालावधीत, उत्कृष्ट दर्जाची आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, यासाठी संबंधित विभागांनी नियमित पाठपुरावा करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.