
देवगड : मराठी चित्रपटसृष्टीत अभिमानाने नोंदवला जाईल असा इतिहास घडवत 'देऊळबंद २' या चित्रपटाने अवघ्या ५० दिवसांत १०० कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमी टप्पा गाठला आहे. या अभूतपूर्व यशामुळे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून, हे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असा विश्वास श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक यशानिमित्त पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला. श्री स्वामी समर्थांच्या कृपाशिर्वादाने साकारलेल्या या चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा श्री स्वामी समर्थांची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अभिनेते मोहन जोशी,निर्माते प्रमेश इंगळे तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आशीष शेलार म्हणाले, "प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली प्रवीण तरडे यांची वाटचाल आज वटवृक्षासारखी बहरली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून समाज, संस्कृती आणि श्रद्धेचा संदेश प्रभावीपणे पोहोचतो. 'देऊळबंद'च्या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो ."
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही, "'देऊळबंद २'ने १०० कोटींचा टप्पा पार करून मराठी चित्रपटसृष्टीला नवी उंची मिळवून दिली आहे. ही यशस्वी परंपरा भविष्यातही कायम राहील, असा विश्वास आहे," असे गौरवोद्गार काढले.
महेश इंगळे यांनी सांगितले की, प्रवीण तरडे यांचे श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धाभाव आणि त्यातून निर्माण झालेली 'देऊळबंद'ची संकल्पना प्रेक्षकांच्या मनाला भिडली. श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचा संगम असलेला हा चित्रपट केवळ व्यावसायिकदृष्ट्याच नव्हे, तर आशयाच्या दृष्टीनेही मोठे यश ठरला आहे.
या सोहळ्यात चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. तसेच आगामी 'देऊळबंद ३' या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली. यामुळे उपस्थित चित्रपटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.










