LIVE UPDATES

मळेवाड येथे ‘राखणदार पदयात्रे'ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जल, जंगल, जमीन,पर्यावरण रक्षणासाठी कोकणी माणूस एकवटला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 15:26 PM
views 288  views

सावंतवाडी : कोकणची समृद्ध निसर्गसंपदा आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी 'राखणदार सेवा संघा' तर्फे सुरू असलेल्या 'राखणदार पदयात्रे' च्या दुसऱ्या टप्प्याला मळेवाड जकात नाका येथे ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गावागावांत या पदयात्रेचे जंगी स्वागत केले जात असून, कोकणच्या रक्षणासाठी आता लोकचळवळ उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे.कोकण वाचवण्यासाठी जन जागृतीची गरज आहे.सर्वांनी राखणदार होणे आवश्यक बनले आहे.

सध्या  सर्वत्र जल, जमीन आणि जंगल झपाट्याने नष्ट होत आहेत.यामुळे गावागावांवर मोठे संकट ओढवले असून, निसर्गरम्य कोकण भकास होण्याच्या मार्गावर आहे. हे गंभीर संकट दूर करण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि जागृत नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या गावच्या आणि निसर्गाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतः ‘राखणदार’ बनण्याची गरज या पदयात्रेतून व्यक्त केली जात आहे.गीते आणि घोषणांनी तसेच प्रत्यक्ष संवाद साधून परिसरात जनजागृती केली जात आहे. पदयात्रेदरम्यान पर्यावरण रक्षणावर आधारित विविध प्रबोधनात्मक गीते, घोषणा आणि थेट संवादाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि आपला गाव व कोकण शाबूत ठेवण्यासाठी सर्वांनी आपल्यातील ‘राखणदार’ जागा करून एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. पर्यावरण, जल आणि जंगलाचे रक्षण करण्यासाठी केवळ घोषणा न देता प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत या पदयात्रेच्या माध्यमातून मांडण्यात आले. या उपक्रमाला मळेवाड परिसरातील अबालवृद्धांसह येथील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.